
परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)।
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे परभणी जिल्ह्यातून सुध्दा महसुल प्रशासनाने हजारो व्यक्तींना वितरित केलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी परभणीचा दौरा करीत महसूल व पोलिस यंत्रणेंतर्गत वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा केली. त्यातून बनावट लाभार्थ्यांची आणखीन एक यादी सादर करीत प्रशासनाने या प्रकरणात आजपर्यंत केलेल्या कारवाईसह अन्य बाबींचा जाब विचारला.
भारतीय जनता पार्टीचे नेते सोमय्या हे कडेकोट बंदोबस्तात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार व भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते.
दीड - दोन तासाच्या या बैठकीतून सोमय्या यांनी परभणी जिल्ह्यातील काही तहसील कार्यालयातून वितरित केलेल्या बोगस जन्मदाखले प्रकरणात गंभीर स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या जिल्ह्यातून हजारो लाभार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे वितरित झाल्यानंतरसुध्दा केवळ 7 बनावट लाभार्थ्यांविरुध्दच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांविरोधात कधी कारवाई होणार, असा सवाल व्यक्त केला. तसेच या जिल्ह्यातून वितरित केलेल्या अन्य बोगस प्रमाणपत्रेधारकांची यादीसुध्दा प्रशासनास सादर केली. यावेळी सोमय्या यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र आधारे अवैधरीत्या वास्तव्य करणार्या या बोगस नागरीकांविरोधात संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर वातावरण पेटले आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिकार्यांनी हयगय करु नये, कठोर भूमिका स्विकारावी, उदासिनता दाखविल्यास त्यांच्या विरोधात मोठी कार्यवाही होईल, असा इशारासुध्दा दिला.
राज्य व केंद्र सरकारने या बनावट लाभार्थ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. यातील बांगलादेशीय किंवा अन्य परकीय नागरीक कोण कोण आहेत याचा शोध एटीएस किंवा एनआय सारख्या संस्था घेऊ लागल्या आहे. त्यामुळे याचे गांभीर्य घ्या, असा इशाराही दिला.
दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलतांना सोमय्या यांनी राज्यात 2 लाख 24 हजार बनावट दाखले, प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. 27 शहरांमधून 32 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पाच हजारांवर लाभार्थ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात अडकलेल्या अधिकार्यांविरोधात सुध्दा निश्चितच मुख्यमंत्री भविष्यात कारवाई करतील, अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केली. आपण परभणी जिल्हा प्रशासनास आज बनावट लाभार्थ्यांची एक नवीन यादी सादर केली आहे, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis