
कोल्हापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ते नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक संपत मोरे यांनी येथे केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या जी.डी.(बापू) लाड अध्यासनाच्या वतीने जी.डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रतिसरकारची चळवळ आणि मराठी साहित्य’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार होते.
प्रतिसरकारच्या चळवळीचे विविध पैलू उलगडून सांगताना संपत मोरे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य अनेकांच्या त्यागातून साकारले आहे. स्वातंत्र्य चळवळीत प्रतिसरकारचे मोठे योगदान आहे. प्रतिसरकारचा जाज्ज्वल्य इतिहास मराठी साहित्यातून प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्यातून क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी.(बापू) लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील प्रसंग साहित्यातून चित्रित झाले आहेत. ना. सी. फडके, ग.दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, वामन होवाळ, रा. तु. पाटील यांच्या साहित्यातील तसेच कथा, शाहिरी काव्य, कादंबरी, आत्मचरित्र यामधून आलेले प्रतिसरकार चळवळीचे चित्रण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याची दखल नव्या पिढीने घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, गांधीच्या विचारसरणीचा नवा अन्वयार्थ प्रतिसरकारच्या चळवळीने लावला. या चळवळीने सामाजिक सुधारणांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्नही केला. त्याबरोबरच सांस्कृतिक परंपरेशी असणारे नाते प्रतिसरकारने कधीही तुटू दिले नाही.
अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अशोक पवार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नवनाथ गुंड, प्रा. सी.एल. रोकडे, मतिन शेख, प्राचार्य आर.एस.डुबल, प्रा. प्रताप लाड तसेच इतिहास विभाग, राज्यशास्त्र विभाग, मराठी विभागातील संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar