
रायगड, 4 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामीण विकासात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत गाणी येथे रविवारी भव्य श्रमदान मोहीम राबविण्यात आली. गाणी आणि कोंढे तर्फे श्रीवर्धन या दोन्ही गावांमधील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि युवकांनी उत्साहात सहभाग नोंदवत गाव विकासाचा सुंदर आदर्श निर्माण केला.
‘एक आठवड्यातून एक दिवस श्रमदानासाठी’ या अभियानाच्या संकल्पनेनुसार सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने कामांसाठी हजर झाले. या मोहिमेत प्रमुख तीन विकासकामे प्रभावीपणे पूर्ण करण्यात आली.
रस्ते दुरुस्ती : कोंढे तर्फे श्रीवर्धन ते गाणी जोडणाऱ्या कच्च्या रस्त्याचे सुस्थितीकरण करून दळणवळण सुलभ केले.
स्मशानभूमी विकास : गाणी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची बांधणी तसेच परिसराची साफसफाई करून परिसर अधिक सुशोभित करण्यात आला.
जलसंधारण : गाणी गावातील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम करून पाणीसाठा क्षमता वाढविण्यास मदत झाली.
या उपक्रमामुळे गावातील सार्वजनिक सुविधा, वाहतूकमार्ग आणि जलसंपत्ती व्यवस्थापनात त्वरित सुधारणा जाणवू लागली आहे. श्रमदान मोहिमेत सरपंच आदित्य कासरुंग, उपसरपंच सुभाष उजळ, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने, सदस्य निखिल कदम, तनिषा आंबरस्कर, माजी सरपंच अनंत शिगवण, कोंढे तर्फे श्रीवर्धन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र शिगवण, गाणी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश धाडवे, तसेच सुदाम शेडगे, नथुराम कासरुंग, संतोष खांडेकर, भिकू खांडेकर, रमेश घोलप यांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
सामूहिक श्रमातून गाव विकासाचा संदेश देणारी ही मोहीम ‘समृद्ध पंचायतराज’ उपक्रमाला बळ देणारी ठरली असून, ग्रामस्थांच्या एकजुटीने ग्रामीण परिवर्तनाची सुंदर दिशा दाखवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके