
पुणे, 4 डिसेंबर, (हिं.स.)। हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव अशा घोषणा देत निगडी, आकुर्डी प्राधिकरण मधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करून रास्ता रोको केला.
निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित सेतू प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढलेले देशी वृक्ष तोडण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होतील व अपघात होण्याची शक्यता आहे. हा हरीत सेतू प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा यासाठी निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या वतीने हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटल जवळ, निगडी प्राधिकरण येथे आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखवून, काळ्या फिती लावून, हातात निषेधाचे फलक धरून आंदोलन केले. यानंतर संस्थेच्या वतीने नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिकांनी सह्या करून निषेध नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु