
- अल्प मतांनीच निकाल ठरण्याची शक्यता
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
पालघर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष आणि ३० नगरसेवक पदांसाठी मंगळवारी जोरदार मतदान पार पडले. सुरुवातीला तिरंगी, नंतर चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात जमले ते भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांमध्ये झालेली ‘कांटे की टक्कर’. साधारण हजार ते दीड हजार मतांच्या फरकानेच नगराध्यक्षपदाचा निकाल लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या निवडणुकीत भाजपचे कैलास म्हात्रे, शिंदे गटाचे उत्तम घरत, उभारच्या उत्तम पिपळे आणि काँग्रेसचे प्रीतम राऊत यांच्यात चौरंगी लढत झाली. पिपळे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवले असून घरत हे दोनवेळा उपनगराध्यक्ष राहिले आहेत. म्हात्रे हे माजी गटनायक असून नगर राजनीति जाणणारे चेहरे आहेत. या अनुभवी तिकडीसमोर प्रीतम राऊत यांनी जोरदार आव्हान उभे केले.
भाजपात तिकीट वाटपातील नाराजी शेवटपर्यंत शांत न झाल्याची चर्चा होती. नव्याने आलेल्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज गटाने इतर उमेदवारांना मदत केल्याचा आरोपही प्रचारादरम्यान होत होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभांमधून आपल्या–आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार आवाहन केले. विकासासाठी निधी देण्याची घोषणाही करण्यात आली.
उत्तम घरत हे २५ वर्षांपासून नगर परिषदेत सक्रिय आहेत. त्या काळात त्यांनी काय काम केले याच्यावर प्रीतम राऊत यांनी थेट सवाल उपस्थित करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या प्रचारशैलीमुळे ते सुशिक्षित मतदारांसह युवक आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये लोकप्रिय झाले. राऊत किती मते मिळवतात यावर घरत आणि म्हात्रे यांच्यातील जय–पराजय अवलंबून राहणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.
पालघर नगर परिषदेत ५५,७२७ पैकी ३६,२१९ मतदारांनी मतदान केले. मतदान टक्केवारी ६५.०७% इतकी नोंदली गेली. तज्ज्ञांच्या मते, १२ हजारांहून अधिक मते मिळवणाऱ्या उमेदवाराच्याच गळ्यात विजयाचा हार पडणार आहे. त्यामुळे अंतिम निकालापर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL