
नाशिक, 4 डिसेंबर (हिं.स.) - २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ ’क्रीडा महोत्सव २०२५’ करीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध क्रीडा प्रकारातील संघ पाठविण्यात आले आहे. यावेळी संघाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. मधुकर भिसे, श्री. बाळासाहेब पेंढारकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, क्रीडांगण हे जीवन मूल्यांचे सर्वोत्तम शिक्षण देणारे स्थान आहे. आरोग्य विद्यापीठाचे खेळाडू केवळ उत्तम आरोग्य शिक्षणच नाही, तर क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिध्द करत आहेत. आंतर-विद्यापीठ क्रीडा महोत्सव हे कठोर परिश्रमाचे, शिस्तीचे आणि खिलाडूवृत्तीचे फलित दाखवण्याचे व्यासपीठ आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी सांगितले की, मैदानावर जो खेळ कराल, त्यात आपले शतप्रतिशत योगदान द्या. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे, पण त्याहून महत्वाचे आहे ते तुमचे सामूहिक कार्य. आपली मानसिकता नेहमी सकारात्मक ठेवा, आपल्या प्रशिक्षकांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येकाने आत्मविश्वासाने खेळावे असे सांगून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ ’क्रीडा महोत्सव २०२५’ मध्ये आरोग्य विद्यापीठातून या महोत्सवाकरिता आठ क्रीडा प्रकारांमधील १६२ विद्यार्थ्यांचा संघ नांदेड येथे रवाना झाला आहे. या आठ क्रीडा प्रकारांमध्ये कबड् डी, खो-खो, व्हॅालीबॅाल, बास्केटबॅाल, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुध्दिबळ यांचा समावेश आहे. या संघासोबत १० क्रीडा मार्गदर्शक आणि ५ संघ व्यवस्थापक देखील सोबत गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
२७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ ’क्रीडा महोत्सव २०२५’ करीता सहभागी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले व अधिकारी व कर्मचारी स्पर्धेकरिता विद्यापीठाच्या संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंकरीता विद्यापीठात विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिरात खेळातील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या संघांमध्ये विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, सिंधदुर्ग, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, परभणी आदी जिल्हयांतील स्पर्धकांची विविध निवड चाचण्यातून निवड करण्यात आली आहे. आंतर-विद्यापीठ ’क्रीडा महोत्सव २०२५’ करीता श्री. समाधान जाधव, श्री. अविनाश सोनवणे, श्री. अर्जुन नागलोत, श्री. घनश्याम धनगर, श्री. शिवम आभाळे, श्री. विशाल काळे यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी