
छत्रपती संभाजीनगर, 4 डिसेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा मुंबईतर्फे ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचे युग’, ‘सोशल मीडिआ : आव्हाने आणि संधी’, तसेच ‘नागरिकांचे जीवन सुलभ करणे’ या विषयांवर कै.श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी निबंध मराठी किंवा इंग्रजी या भाषेत, निवडलेल्या विषयावर 3 हजार ते 5 हजार शब्दांच्या मर्यादेत लिहिणे आवश्यक आहे. निबंध विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असावा. निबंध फक्त कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून, त्यावर केवळ टोपणनाव नमूद करावे. निबंधाच्या चार प्रती सादर करणे आवश्यक असून, स्पर्धकांनी निबंधावर स्वतःचे नाव किंवा ओळख नमूद करु नये.
निबंधाच्या प्रतींसोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धेचे नाव (मराठी व इंग्रजीत), स्पर्धकाचे टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करून पाठविणे आवश्यक आहे.
या निबंध स्पर्धेत पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे बक्षीस 7 हजार 500, तिसरे बक्षीस 5 हजार तसेच उत्तेजनार्थ 2 हजार रुपये असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध तयार करून भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा, मुंबई - 400032 येथे दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis