
कोल्हापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
स्वराज्यरक्षिका, करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या उज्वल व महापराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी व त्यांचा अनभिज्ञ इतिहास समाजापुढे यावा व त्यांचे जीवन चरित्र प्रसार देशभर व्हावा यासाठी र्वािवध उपक्रम आयोजित केले आहेत.
यावर्षी अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने पहिल्यांदा मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 हा पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर करीत आहोत. पुरस्कार समारंभ 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे.अशी माहिती मराठा महासंघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती सांगताना मुळीक म्हणाले मेजर स्वाती महाडिक या जम्मू काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचा संकल्प त्यांनी केला, तसेच त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा अंगीकार करण्याचा निश्चय करीत आपल्या जीवनात महाराणी ताराराणी यांच्या प्रमाणे संघर्षमय जीवनाची दिशा स्वीकारली. या त्यांच्या आदर्शाची युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार प्रदान करीत आहोत. रणरागिणी ताराबाई या करवीर संस्थापिका, अन् त्यांच्या नगरीत हा सन्मान होत आहे ही अभिमानाची बाब आहे.
महाराणी ताराराणी चौक येथे 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मेजर स्वाती महाडिक यांचे आगमन होईल. तेथे महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला मेजर स्वाती महाडिक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण होईल. तेथून प्रमुख कार्यकर्त्यांसह दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आगमन होईल. याठिकाणी मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडीक यांना प्रदान मेजर जनरल एम.एन. काशीद व मा. योगेश कुमार गुप्ता, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या हस्ते तसेच मा. राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलावडे, शिवाजीराव परुळेकर यांच्या उपस्थितीत होणार असून या प्रसंगी महाराणी ताराबाई : एक अभ्यास या विषयावर मा. इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक यांचे व्याख्यान होणार आहे. तरी बंधू-भगिनी व आजी माजी सैनिकांनी या ऐतिहासिक पुरस्कार समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करीत आहोत.
यावेळी शैलजा भोसले, महिला अध्यक्ष, सी. एम गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, उदय देसाई, बबनराव रानगे, एम.डी.देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, शरद साळुंखे, कादर मलबारी, संजय कांबळे, अवधूत पाटील उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar