
रायगड, 4 डिसेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी अखंड लढा देत राज्यभरातील जनतेच्या मनात स्थान मिळवलेले मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील येत्या रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी पनवेलच्या ऐतिहासिक भूमीत आगमन करणार आहेत. सकल मराठा समाजाच्या पुढाकाराने खांदा कॉलनी वसाहत परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उद्घाटन तसेच मराठा कृतज्ञता मेळावा या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनोजदादा जरांगे पाटील समाजाला मार्गदर्शन करणार असून, मराठा समाजाच्या चालू प्रश्नांवर तसेच पुढील लढ्याच्या दिशा–दर्शक भूमिकेबाबत महत्त्वाचे संदेश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खांदा वसाहतीतील मराठा भवनाचे उद्घाटन हा स्थानिक मराठा समाजासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार असून, या नव्या भवनातून भविष्यातील सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि समाज बांधणीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे हा सोहळा संपूर्ण पनवेल तालुक्यात उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयारी जोरात सुरू असून, समाजबांधवांना आवाहन करत संतोष जाधव यांनी सांगितले की, “पनवेल आणि परिसरातील सर्व मराठा बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजकर्तव्य पार पाडावे.” मनोजदादा जरांगे यांच्या आगमनामुळे पनवेलमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा हा कृतज्ञता मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके