
छत्रपती संभाजीनगर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
आज छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात राज्यातील ५०० आयडॉल शिक्षकांची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५०० आदर्श (आयडॉल) शिक्षकांची या विशेष प्रशिक्षण उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती
राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, आयडॉल शिक्षकांच्या यशोगाथा इतरांना मार्गदर्शक ठरवणे तसेच अध्यापन पद्धतींमध्ये नावीन्य निर्माण करणे हा या आयडॉल उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यशाळेनंतर हे निवडलेले शिक्षक आपल्या-आपल्या शाळा व केंद्रामध्ये शैक्षणिक सुधारणा उपक्रम राबविणार असून इतर शिक्षकांसाठी मार्गदर्शकाची भूमिका देखील पार पाडणार आहेत.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मंत्री भुसे म्हणाले की,विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि भविष्याभिमुख दृष्टीकोन स्वीकारण्याची आवश्यकता यावर विशेष भर दिला. तसेच शिक्षण विभाग लवकरच आयडॉल शिक्षकांची, शाळांची व संस्थांची बँक तयार करणार असल्याचे मत मांडले. तसेच शिक्षकांना उद्देशून आवाहन केले की, “तुम्ही घडवलेला एक विद्यार्थी भविष्यात देश घडवतो. म्हणून प्रत्येक तास, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती ही राष्ट्रनिर्मितीचाच भाग मानून कार्य करा.”
या कार्यशाळेत राज्यभरातून आलेल्या आयडॉल शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. नवीन अध्यापन पद्धती, आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर, डिजिटल शिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण तसेच विद्यार्थी विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शक सत्रे घेण्यात आली. श्री. दत्तात्रय वारे गुरुजी पुणे, श्री. केशव गावित नाशिक, श्री. राजेंद्र पतेकर चंद्रपूर, श्री. खुर्शिद शेख गडचिरोली या तज्ञ मार्गदर्शकांनी शिक्षकांना आपले शैक्षणिक नवसंकल्पना, प्रकल्पाधारित शिक्षण,लोकसहभाग, प्रभावी वर्गव्यवस्थापन आणि विद्यार्थी प्रेरणा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पंकज भोयर, राज्यमंत्री, शालेय शिक्षण, सचिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.), राहुल रेखावार (भा.प्र.से.) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, दिलीप स्वामी (भा. प्र. से.) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, श्री अंकित (भा प्र से) मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, श्री. कृष्णकुमार पाटील, संचालक, योजना यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यातील शिक्षकवर्ग व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis