
नांदेड, 4 डिसेंबर (हिं.स.)।
शेतकऱ्यांवरील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांशी समन्वय साधून शेतीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबाबत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज संसदेचे लक्ष वेधले.
राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मानव–वन्यप्राणी संघर्षाबाबत खा. सी. षण्मुगम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चेत सहभाग घेताना खा. चव्हाण बोलत होते. शेतकऱ्यांवर होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, साधारणपणे कृषीपंपांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अंधारात शेतात जावे लागते आणि या वेळेत वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची शक्यता अधिक असते.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांशी समन्वय साधून शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यास अशा हल्ल्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, अशी सूचना त्यांनी मांडली. याशिवाय वन्यप्राणी शेतात घुसून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी करतात, त्यामुळे वनक्षेत्रालगतच्या शेतीभागांत कुंपण उभारण्यासारख्या उपाययोजनांची गरज असल्याचेही खा. चव्हाण यांनी नमूद केले.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेचे स्वागत केले. वनक्षेत्रांच्या सीमेजवळ मानवी वस्तीमध्ये हल्ल्याच्या घटना वाढत असतील, तर आवश्यकतेनुसार असे भाग निश्चित करून तिथे वन्यजीव व्यवस्थापन योजनेंतर्गत सीमांकन केले जाते, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis