
नाशिक, 4 डिसेंबर (हिं.स.)।
अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या अभियंत्यांचा ‘वार्षिक अभियांत्रिकी पुरस्कार सोहळा’ शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी होणार आहे. यंदाचा आऊटस्टॅन्डींग इंजिनीअर पुरस्कार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, ओझरचे सीईओ इंजि. साकेत चतुर्वेदी यांना देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल यांनी दिली.
अभियांत्रिकी क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणार्या अभियंत्यांना आऊटस्टॅन्डींग इंजिनीअर पुरस्कार, इंजिनीअरिंग अचिव्हमेंट पुरस्कार, युवा पुरुष आणि महिला अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार दिले जातात. यंदाचा आऊटस्टॅन्डींग इंजिनीअर पुरस्कार अतुल अडवदकर, डॉ. हेमराज कुमावत, डॉ. राजेंद्रकुमार तातेड, सुनील दत्तू भोर, सुरेंदर कुमार तर डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा, अरिहंत जैन, अजिंक्य कोठावले, डॉ. पराग मोंढे, वासू मित्तल यांना युवा पुरुष अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
महिला अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार आयुषी डुंगरवाल, डॉ. बिपासा पात्रा, स्नेहल इंगळे यांना देण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचे जनक डॉ. सुधांशू मणी प्रमुख पाहुणे तर दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोलकाताचे निर्वाचित अध्यक्ष मनीष कोठारी यांचीही प्रमुख उपस्थिती राहील.
यावेळी दि इंन्स्टिटयूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेंटरचे अध्यक्ष समीर कोठारी, मानद सचिव वेदांत राठी, आयोजक समितीचे अध्यक्ष नरेंद्र बिरार, सहसचिव दिपक पाटील, धीरज पिचा, कौन्सिल मेंबर संतोष मुथा, सुमित खिंवसरा, विपुल मेहता, सुनील बाफना, विलास पाटील, अनिकेत बागडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV