जळगाव : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा पाऊस
जळगाव, 4 डिसेंबर, (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून, शेवटच्या दिवशी ३,०१५ हरकती दाखल झाल्या. त्यामुळे मनपाकडे आलेल्या एकूण हरकतींची संख्या तब्बल १८,९४६ वर पोहोचली
जळगाव : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा पाऊस


जळगाव, 4 डिसेंबर, (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून, शेवटच्या दिवशी ३,०१५ हरकती दाखल झाल्या. त्यामुळे मनपाकडे आलेल्या एकूण हरकतींची संख्या तब्बल १८,९४६ वर पोहोचली आहे. या प्रचंड हरकतींचा निपटारा करण्यासाठी मनपा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडणार आहे. प्रारूप मतदारयादी २० नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती आणि हरकती नोंदविण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली होती. या काळात जवळपास १९ हजार हरकती दाखल झाल्या. मनपाच्या १९ पथकांनी आतापर्यंत ६,२०० हरकतींचा निपटारा केला आहे.

सरासरी दिवसाला ४७६ हरकती निकाली काढल्या जात आहेत. हीच गती कायम राहिली तर उरलेल्या सहा दिवसांत केवळ २,८५६ हरकतींचाच निपटारा होऊ शकतो आणि सुमारे ९,८९० हरकती प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करायची असल्याने ९ डिसेंबरपर्यंतचे सर्व काम पूर्ण करण्यासाठी मनपालाच आता दिवसाला तब्बल २,१२४ हरकतींचा निपटारा करावा लागणार आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण तब्बल पाचपटीने वाढण्याची स्थिती आली आहे. दरम्यान, या बोजापासून मुक्तता मिळविण्यासाठी महापालिकेने तातडीने ५२ जणांची अतिरिक्त टीम नियुक्त केली आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी ३ डिसेंबर रोजी या संदर्भात बैठक घेऊन पथकांना मार्गदर्शन केले. प्रारूप यादीतील त्रुटींचा भरणा मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रशासनावर प्रचंड दबाव आला आहे. निपटारा वेळेत व्हावा म्हणून २२ ते २५ जणांच्या प्रत्येकी अशा पथकांची स्वतंत्रपणे नियुक्ती करून कामाला गती देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande