
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेला जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.यावेळी प्रादेशिक सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय सुनील जाधव, उपायुक्त नियोजन संजय मरकळे, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रियांका बोकील, तसेच जिल्हा सांख्यिकी आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल प्रशासनाला धोरणनिर्मितीत, विकास आराखडा तयार करतांना प्राधान्यक्रम ठरवितांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासपूर्ण दस्तऐवजांची आवश्यकता आहे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने संकलित केलेल्या आकडेवारीच्या आधारे तयार केलेला हा अहवाल जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, संशोधक व विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असेही श्री. डुडी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु