
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांपासून विमानांच्या वेळापत्रकात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात इंडिगोच्या उड्डाणांच्या मोठ्या प्रमाणात विलंब आणि रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यासाठी इंडिगोकडून नवीन लागू झालेली पायलट ड्युटी नियमावली (एफडीटीएल), विश्रांतीबाबतचे सुधारित नियम, क्रूची कमतरता, तांत्रिक बिघाड, विमानतळांवरील ट्रॅफिक कंजेशन, चेक-इन प्रणालीतील अडचणी, प्रतिकूल हवामान, तांत्रिक समस्या आणि इतर ऑपरेशनल बाबी यासारखी अनेक कारणे देण्यात आली आहेत. परंतु असे प्रामुख्याने पुढे आले आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अचानक सेवा विस्कळीत होण्याचे मुख्य कारण हे कॉकपिट क्रू म्हणजेच पायलट ची कमतरताच आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल त्रुटींमुळे विमानसेवा ठप्प झाली असून, केवळ दोन दिवसांत तब्बल 38 विमाने रद्द करावी लागली आहेत. यामुळे हजारो प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले असून, विमानतळावर गोंधळाची परिस्थिती आहे. डीजीसीएने गेल्या काही महिन्यात पायलट साठीचे नवीन एफडीटीएल आणि विश्रांतीचे नियम अमलात आणले होते आणि हे नियम संपूर्णपणे एक नोव्हेंबर 2025 पासून लागू करणे एअरलाइन्सवर बंधनकारक होते जे अर्थातच इंडिगोला माहीत होते. म्हणूनच या बदलांचा क्रू उपलब्धतेवर होणारा परिणाम ओळखणे, त्यानुसार आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची योग्य भरती, त्यांचे रोस्टरिंग इत्यादींचे आवश्यक नियोजन करणे ही इंडिगो व्यवस्थापनाची जबाबदारी होती. जर एअरलाइन्सने यासाठी वेळेवर तयारी केली असती, बदललेल्या गरजेनुसार पायलटची भरती केली असती, बफर पायलट्सची योग्य संख्या उपलब्ध ठेवली असती, हिवाळी वेळापत्रक पायलट व विमान यांच्या वास्तविक उपलब्धतेनुसार सुधारले असते आणि नवीन नियमांशी जुळवून घेण्यासाठी आंतरिक प्रक्रियांमध्ये बदल केले असते, तर ही गंभीर परिस्थिती टाळता आली असती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु