
रत्नागिरी, 4 डिसेंबर, (हिं. स.) : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चिपळूण तालुक्यातील अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग म्हणून तेथील वाहतूक खडपोली पेढांबे अलोरे शिरगांव कुंभार्ली कोंडफणसवणे रस्ता प्रजिमा २८ पर्यंत वळविण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे. असा आदेश देणारी सूचना अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चिपळूण तालुक्यातील विकासकामांना दिलेल्या भेटी दरम्यान, अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पुलाची पाहणी केली असता, हा पूल अतिशय नादुरुस्त झाला असल्याचे आढळले. या पुलावरून खासगी वाहतूक सुरू आहे.
पुलाचे 8 पिलर पूर्णपणे नादुरुस्त झाले असून, ते पिलर व पुलाच्या खालच्या बाजूचे कॉंक्रीट पडल्याने स्टील उघडे पडले आहे. तसेच 2 पिलरच्या पायाच्या तळापर्यंत मोठी भगदाडे पडली असून, पूल कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या पुलाचे बांधकाम 2010 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंत्यांनी केलेली पाहणी व जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिपळूणचे उपअभियंता यांनी दिलेल्या अहवालानुसार पूल वापरण्यास अतिशय धोकादायक झाल्याचे दिसत असून वाहतुकीस बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी