
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)। अलीकडे पालघर जिल्ह्यात बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांबाबत अफवा, फोटो आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विक्रमगड तालुक्यात एका मुलावर झालेला हल्ला, माखाडा तालुक्यातील वारघड पाडा येथे दिसलेला बिबट्या तसेच खोच परिसरात लहान मुलावर झालेली हल्ल्याची घटना यामुळे नागरिक अधिकच घाबरले आहेत. त्यातच सामाजिक माध्यमांवर एआयच्या सहाय्याने तयार केलेले काही बनावट फोटोही व्हायरल होत असल्याने अफवांना अधिक खतपाणी मिळत आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात काही ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसला असला तरी अनेक माहिती आणि फोटो भ्रामक आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोखाडा, जव्हार, विक्रमगड परिसरात जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. शाळा–महाविद्यालयांसह गावागावांत जाऊन बिबट्या दिसल्यास घ्यावयाची काळजी, वर्तन नियम आणि सुरक्षा उपाय याबाबत जागृती केली जात आहे.
वनविभागाने सांगितले की, जंगलातील भक्ष्य कमी झाल्याने तसेच जनावरे कमी संख्येने जंगलात जात असल्याने बिबट्या गावांच्या सिमेवर किंवा पिकांनी दाटलेल्या ठिकाणी येऊ लागले आहेत. सध्या मादी बिबट्या प्रसूत होत असल्याने सुरक्षित जागेच्या शोधात त्या गावाजवळील झाडीत थांबण्याची शक्यता वाढते.
बिबट्याला पकडणे किंवा मारण्यासाठी केंद्राची विशेष परवानगी आवश्यक असून तो शेड्युल–१ मधील संरक्षित प्राणी आहे. तरीही वाढती संख्या लक्षात घेता बिबट्याला शेड्युल–२ मध्ये हलवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचेही समजते.
नागरिकांनी रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि जनावरे गायब झाल्यास लगेच वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनावरे बिबट्याने उचलल्यास त्याची भरपाई विभागाकडून दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL