
रत्नागिरी, 4 डिसेंबर, (हिं. स.) : गीता जयंतीचे औचित्य साधून संस्कृत भारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण गीतापारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या रविवारी (दि. ७ डिसेंबर) दुपारी ३.३० वाजता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे भगवद्गीता पठण सुरू होणार आहे. तर सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यातील डॉ. सुचेता परांजपे यांचे दैनंदिन जीवनातील गीता या विषयावर व्याख्यान होणार आहे.
श्रीमद् भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेले अमृतच आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला भगवंताने हे गीतामृत अर्जुनाला सांगितले, असे आपली परंपरा मानते. म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी गीताजयंती साजरी करण्यात येते. त्याचे औचित्य साधून रविवारी गीता पठणाचे आयोजन केले आहे. गीता पठणानंतर सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यातील डॉ. सुचेता परांजपे यांचे दैनंदिन जीवनातील गीता या विषयावर व्याख्यान होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा लाभ गीताप्रेमी, ज्येष्ठ आणि रत्नागिरीकरांनी घ्यावा, असे आवाहन संस्कृत भारतीच्या वतीने डॉ. कल्पना आठल्ये, तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. दिनकर मराठे आणि दक्षिण रत्नागिरी प्रमुख अक्षया भागवत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी