
रत्नागिरी, 4 डिसेंबर, (हिं. स.) : सावर्डे (ता. चिपळूण) येथील विद्यालयाच्या धावपटूंनी प्लास्टिक मुक्तीचा आदर्श उपक्रम समाजासमोर ठेवला आहे.
चिपळूण येथील संघर्ष क्रीडा मंडळ आणि सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “चला धावू प्लास्टिक मुक्तीसाठी” या घोषवाक्याखाली चिपळूण हाफ मॅरेथॉनचे आयोजन पवन तलाव परिसरात करण्यात आले होते. देशभरातील अनेक नामवंत धावपटूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या धावपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेनंतर मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यालयात जळगावच्या महात्मा गांधी तीर्थ संस्थेच्या प्रेरणेने राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवत एक स्वयंप्रेरित स्वच्छता मोहीम राबवली.
एकूण ६४ विद्यार्थी-खेळाडू मैदानात उतरले आणि संपूर्ण परिसरातील कचरा गोळा करून त्याचे कागद, प्लास्टिक व टेट्रा पॅक अशा गटांत वर्गीकरण केले. प्लास्टिक कचरा सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांच्याकडे पुनर्वापरासाठी सुपूर्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करत मैदानातील प्रत्येकाला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांच्या या उपक्रमाचे संघर्ष क्रीडा मंडळाचे मान्यवर व पदाधिकारी यांनी मनापासून कौतुक केले.
प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी धावपटूंचे अभिनंदन करत प्लास्टिकमुक्तीचा संदेश कृतीतून दिल्याबद्दल त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी