सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी - जयकुमार रावल
नंदुरबार, 4 डिसेंबर, (हिं.स.) सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यानपिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा व यात्रेनिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन भक्कमपणे चेतक महोत्सव समितीच्
मंत्री जयकुमार रावळ


नंदुरबार, 4 डिसेंबर, (हिं.स.) सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यानपिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा व यात्रेनिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन भक्कमपणे

चेतक महोत्सव समितीच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार

रावल यांनी केले आहे. ते आज सारंगखेडा येथे दत्तजयंतीनिमित्त सुरू होणाऱ्या यात्रोत्सव व चेतक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी

बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन

गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, चेतक

महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपालसिंह रावळ, सारंगखेड्याचे सरपंच पृथ्वीराज रावळ, आयोजन समितीचे

प्रणवराज रावळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. रावल म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना व्यापून

असलेल्या पवित्र तापी नदीच्या तीरावर हा महोत्सव आणि यात्रोत्सव शेकडो वर्षांपासून आपली परंपरा घेऊन

डौलाने उभा आहे. दत्तप्रभूंच्या उपासनेसोबत या महोत्सवाला जगविख्यात अशा अश्वमेळा व पशुमेळ्याची

रूपेरी किनार लाभली आहे. दररोज सुमारे 75 हजार लोक या यात्रेला येतात. पूर्वी लोक बैलगाड्याने इथे येत

असत; आज आपल्या आधुनिक वाहनांवर येतात तेही घोडे पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी. जिथपर्यंत

नजर पोहोचत नाही, तिथपर्यंत विविध प्रकारचे अश्व या यात्रेत आलेले पाहायला मिळतात. जगभरातून

अश्वप्रेमी येथे येत असतात. अगदी शेकडो वर्षांपूर्वी दक्षिण भारतापासून ते अफगाणिस्तानपर्यंतचे लोक या

यात्रोत्सवातून घोडे घेण्यासाठी येत असल्याच्या नोंदी आढळतात. आजही जपान, अरबस्तान येथूनही अश्वप्रेमी

येथे येतात.

ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पर्यटन मंत्री असताना चेतक महोत्सवाला

ग्लोबल करण्यासाठी; येथील धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले.

सलग तीन वर्षे या यात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. हजारो लोकांची उपजीविका या

यात्रेवर आधारित आहे. मसाल्याचे पदार्थ,शेतीची औजारे, खाद्यपदार्थ विकणाऱ्या कित्येक लोकांचे वार्षिक

उत्पन्नाचे साधन ही यात्रा आहे. या महोत्सवाला अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही शासनाच्या वतीने

प्रयत्नशील असल्याचेही श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

या महोत्सवाला अधिक प्रभावशाली आणि व्यापक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या चेतक महोत्सव

समितीचे जयपालसिंह रावळ यांच्या अथक प्रयत्नांतून हा महोत्सव भारतीयांसह जगभरातील पर्यटकांना

खुणावत असल्याचे सांगून, प्रसिद्ध उद्योजक अनंत अंबानी यांची या महोत्सवाला येण्याची इच्छा असल्याचेही

मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते चेतक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सर्व मान्यवर

उपस्थित होते. त्यानंतर महोत्सवातील अश्वांची पाहणी मंत्री श्री. रावल व उपस्थितांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande