परभणी : तीर्थक्षेत्र दत्तधामला श्री दत्ता जन्मोत्सव जल्लोषात
परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)। येथील वसमत रस्त्यावरील तीर्थक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी गुरुवारी (दि.04) सायंकाळी सहा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्हभ दिगंबरा’ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त या गजरात, प्रचंड जयघोषात श्री
तीर्थक्षेत्र दत्तधामला श्री दत्ता जन्मोत्सव जल्लोषात


परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)।

येथील वसमत रस्त्यावरील तीर्थक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी गुरुवारी (दि.04) सायंकाळी सहा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्हभ दिगंबरा’ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त या गजरात, प्रचंड जयघोषात श्री दत्त जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

वसमत रस्त्यावरील हे तीर्थक्षेत्र स्थान दत्त मंदिर दत्त भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण सप्ताहात गुरुचरित्र पारायणासह भरगच्च असे धार्मिक विधी, महाअभिषेक, भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात पहाटेच या तीर्थक्षेत्रस्थानी श्री दत्तात्रयाच्या दर्शनाकरीता मोठ्या रांगा लागल्या. त्या बरोबरच या ठिकाणी सकाळी महाअभिषेकास अन्य धार्मिक विधींना सुरुवात झाली. महारुद्र अभिषेकाचा सोहळा 90 ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी महानैवेद्याचा व आरतीचा कार्यक्रम झाला. त्या पाठोपाठ प्रसाद वाटपाचाही कार्यक्रम दिवसभर सुरु होता. उपवासाच्या निमित्त पूर्ण फराळाचीची व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली होती. दत्त जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली. 33 बाय 50 आकाराची सुंदर व भव्य अशी रांगोळीसुध्दा काढण्यात आली होती. भक्तगणांनी काढलेली ही रांगोळी भाविकांसाठी लक्षवेधी ठरली.

या तीर्थक्षेत्र ठिकाणी सायंकाळी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कीर्तनाचा सोहळा सायंकाळी 5 वाजता सुरु झाला. दस्तापूरकर महाराज यांनी आपल्या सुंदर वाणीतून, कीर्तनातून श्रीदत्तगुरु यांची महिमा विशद केली. त्यास हजारो भाविक उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. या कीर्तन सोहळ्यानंतर प्रमुख असा कार्यक्रम म्हणजे श्री दत्त जन्मोत्सवास प्रारंभ झाला. सायंकाळी सहा वाजता हजारो दत्त भक्तांच्या उपस्थितीत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्हव दिगंबरा’ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त या गजरात, प्रचंड जयघोषात श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आरतीने या जन्मोत्सवाचा समारोप झाला. भाविकांनी दर्शनाकरीता रात्री उशीरापर्यंत रांगा लावल्या होत्या. तत्पूर्वी दीपोत्सवाचाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या मंदिराच्या सभागृहात 1008 दिवे भक्तगणांद्वारे प्रज्वलित करण्यात आले. या दिपोत्सवाने सभागृह व मंदिर परिसर उजळून निघाला. दरवर्षीप्रमाणे सायंकाळी जन्मोत्सवानंतर पालखी सोहळ्याची तयारी सुरु झाली होती.

या जन्मोत्सव सोहळ्याकरीता दत्तधाम संस्थानचे प्रमुख मकरंद महाराज, त्यांचे सहकारी मुकुंद महाराज यांच्यासह अच्युतराव कारेगांवकर, लक्ष्मणराव कुलकर्णी, दिलीप जोशी, सुरेंद्र जोशी, दिपक बेलापुरकर, बाबाराव काळे, अच्युतराव आवचार, सदाशिवराव आवचार यांच्यासह अन्य दत्तभक्तांनी संपूर्ण नियोजनासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande