सोलापुरातील १२,२६८ बेशिस्त वाहनचालकांवर खटले
सोलापूर, 4 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये-जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या १२ हजार २६८ वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ७८० जणांनी ३ डिसेंबरपर्यंत साडेआठ लाखांचा दंड भरला आहे. पण, दंड होऊनही तीन महिन्यांत तो न भरल
सोलापुरातील १२,२६८ बेशिस्त वाहनचालकांवर खटले


सोलापूर, 4 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये-जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या १२ हजार २६८ वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ७८० जणांनी ३ डिसेंबरपर्यंत साडेआठ लाखांचा दंड भरला आहे. पण, दंड होऊनही तीन महिन्यांत तो न भरलेल्या चार हजार ३१८ वाहनचालकांना वॉरंट व समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना १३ डिसेंबरच्या लोकअदालतीत सहभाग घेऊन तो दंड भरावाच लागणार आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यांचा दंड माफ करण्याची कोठेही तरतूद नाही. कोर्टात ज्या वाहनधारकांवर खटले दाखल आहेत, त्यांच्या दंडाच्या बाबतीत लोकअदालतीत विचारविनिमय होतो. मात्र, सोशल मीडियातून काहीजण चुकीचा मेसेज पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत. ज्या वाहनचालकास वाहतूक नियम मोडल्याने दंड झाला, तो कधी ना कधी भरावाच लागेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, चुकीचा दंड पडल्याची कोणाची तक्रार असल्यास ते वाहनधारक शहरातील वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार करू शकतात. त्याठिकाणी त्याची शहानिशा करून चुकीचा दंड पूर्णतः माफ केला जातो, असेही पोलिस अधिकारी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande