
सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। एमआयडीसीने नोटीस दिल्यानंतर चिंचोली एमआयडीसीतील सीएनजी पंप मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे. सोलापूर व परिसरातील सीएनजीच्या वाहनांसाठी या पंपावरून हमखास गॅस मिळत होता. आता हाच पंप झाल्याने आज दिवसभर सीएनजीचा तुटवडा प्रकर्षाने जाणवला. सीएनजी मिळत नसल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा दोन दिवसात सुरळीत करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिल्या आहेत.
चिंचोली एमआयडीसीतील आयएमसी कंपनीच्या सीएनजी पंपाला परवानगी नसल्याने एमआयडीसीने ९ लाख रुपयांचा दंड ठोठावत या पंपाला नोटीस दिली आहे. सात दिवसात आयएमसीने म्हणणे मांडावे अशी सूचना एमआयडीसीने केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सीएनजी पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. सीएनजी मिळत नसल्याने वाहनधारक हैराण झाले असून गैरसोय लवकर संपवावी अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड