
परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)।
गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन कोणतीही कसर ठेवणार नाही. नागरिकांनी निर्भयपणे परिसरात सण-उत्सव साजरे करावेत, असे प्रतिपादन कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी केले.
लोकश्रेय मित्र मंडळ आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. गुन्हेगारवर्गावर पोलीसांचा वचक निर्माण झाल्याने गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले व्यक्ती ठाण्यात येण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठी अनेकदा विचार करतात, असे त्यांनी नमूद केले. परिणामी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, विभागीय शहर पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसा-रात्र पायी पेट्रोलिंग करीत असून, कोणत्याही वादाच्या तक्रारीत तात्काळ दखल घेऊन मूळ कारणांचा शोध घेत प्रतिबंधक कारवाई केली जाते. त्यामुळे मोठ्या भांडणांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे कासले यांनी सांगितले.
एकमेकांत वाद असलेल्या व्यक्तींना समजावून सांगून परस्पर लेखी समझोते करून देण्यात येत असल्याने जनतेत समाधान व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात रोजची कारवाई सुरू असून, यामुळे अशा वाहनचालकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णाभाऊ साठे जयंती, गणेश उत्सव, बकरी ईद, नवरात्र महोत्सव, ईद-ए-मिलादुन्नबी अशा महत्त्वाच्या सणांच्या वेळेस दृढ बंदोबस्त ठेवून सर्व सण शांततेत पार पाडण्यात पोलिसांना यश मिळाले.
परिसरात कोणी अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती नागरिकांनी निर्भयपणे द्यावी, असे आवाहन कासले यांनी केले.
लोकश्रेय ही पोलीस मित्र मंडळ असून, नेहमीच पोलिसांना सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी गौरवपूर्वक सांगितले. या वेळी सलीम इनामदार यांनी कर्तव्यदक्षा सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास दर्गा रोड बीट जमादार शेख गौस, सम्राट कोरडे, दानिश इनामदार, शेख नजो यांसह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी, कोतवाली पोलिस ठाण्याची सरहद्द मोठी असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कासले यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis