
लातूर, 4 डिसेंबर (हिं.स.) - लातूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून शोधमोहीम राबवत येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात दि. 01.12.2025 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतला तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तोंडारपाटी साखर कारखाना—हंगरगा रोडमार्गे एक चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडून पहाटे 04.35 वाजता तोंडारपाटी साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला. पथकाने एक टाटा इंडिका व्हिस्टा, सिल्व्हर रंगाची, MH-14 FM-5881 वाहन थांबवले वाहनामध्ये बसलेल्या दोनपैकी एक इसम अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेला. तर वाहन चालक 1) संदीप वैजनाथ शिंगे (वय 30 वर्षे), रा. लोहारा, ता. उदगीर, जि. लातूर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पळून गेलेल्या इसमाचे नाव – 2) दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे, रा. लोहारा, ता. उदगीर असे समजले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. त्यामध्ये देशी दारूच्या 32 बॉक्स, दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन MH-14 FM-5881असा एकूण ₹4,23,200/- (चार लाख तेवीस हजार दोनशे रुपये) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींकडून अवैधरीत्या देशी दारूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखे कडून नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ), 65(ई), 81, 83 नुसार पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी संदीप वैजनाथ शिंगे यास अटक करण्यात आली असून फरार आरोपी दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे याचा शोध सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis