बीड-तुळजापूर महामार्ग ५२ वर दरोडेखोरांची दहशत; १० 'हॉटस्पॉट' जाहीर, प्रवाशांना सतर्कतेचा इशारा!
बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)। बीड ते तुळजापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ५२ वर लूटमार, चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने महामार्गावरून प्रवास करणाऱ्य
बीड-तुळजापूर महामार्ग ५२ वर दरोडेखोरांची दहशत; १० 'हॉटस्पॉट' जाहीर, प्रवाशांना सतर्कतेचा इशारा!


बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)।

बीड ते तुळजापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ५२ वर लूटमार, चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांना एक अत्यंत महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी काही धोकादायक 'हॉटस्पॉट' जाहीर केले असून, नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.

​पोलिसांनी सुरक्षेसाठी जे १० ठिकाणे 'धोकादायक' म्हणून घोषित केले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मांजरसुंबा घाट (बीड), चौसाळा बायपास, पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पार्डी फाटा, घुले माळ जवळील उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोल नाका, येडशी बायपास आणि धाराशिव ते तुळजापूर या भागांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी.

​चोरट्यांची कार्यपद्धती:

​या भागात गुन्हेगार विविध मार्गांनी प्रवाशांना लक्ष्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची कार्यपद्धती अशी आहे की, ते धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून कृत्रिम अपघात घडवतात आणि त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटतात. याव्यतिरिक्त, रस्त्यावर जनावरे सोडून वाहनाची गती कमी करायला लावणे किंवा ठिबकचे पाईप बंडल वापरून कृत्रिम गतीरोधक तयार करणे, अशा प्रकारे वाहन थांबायला भाग पाडले जाते आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत मारहाण करून सामूहिक लूट केली जाते. दुचाकीस्वारांना धक्का देणे, 'चैन स्नॅचिंग' करणे, तसेच दुभाजकातील झाडा-झुडपांमध्ये लपून वाहनांवर हल्ला करणे, अशा पद्धतींचा अवलंब केला जात आहे. रात्रीच्या वेळी हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

​सुरक्षिततेच्या सूचना:

​त्यामुळे प्रवाशांनी वर नमूद केलेल्या धोकादायक ठिकाणी आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे पूर्णपणे टाळावे. रात्रीच्या वेळी शक्यतो एकटे प्रवास न करता अनेक वाहनांच्या समूहाने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहन चालवताना दुभाजकाला (Divider) एकदम खेटून न चालवता थोडे अंतर राखावे, कारण चोरटे झुडपात लपलेले असू शकतात. रस्त्यात लाकूड, दगड किंवा इतर संशयास्पद वस्तू आढळल्यास गाडी थांबवू नये, तर वेगात पुढे निघून जावे.

​पोलिसांनी या मार्गावर सुरक्षेसाठी ७ गस्ती पथके तैनात केली आहेत. काहीही संशयास्पद आढळल्यास त्वरित जवळचे हॉटेल, पेट्रोल पंप किंवा धाबा यांसारख्या वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्यावा आणि तात्काळ मदतीसाठी ११२ डायल करावा. याव्यतिरिक्त, पोलीस निरीक्षक शंकर शिंदे (वाशी - 93551 00100), सपोनि गोसावी (नेकनूर - 90090 08070), सपोनि भालेराव (येरमाळा - 94043 35333) आणि सपोनि निशीकांत शिंदे (महामार्ग सुरक्षा - 98500 90833) या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande