
नाशिक, 4 डिसेंबर (हिं.स.)।
: तपोवन परिसरातील चालू असलेल्या वृक्षतोडी विरोधात पत्रकार निरंजन टकले आणि काही व्यक्ती आक्षेप घेत आहेत. मात्र या विषयावर त्यांना अनावश्यक महत्त्व दिले जात असल्याची टीका भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केली.
केदार म्हणाले, “निरंजन टकले यांनी साधूसंतांबाबत, कुंभमेळ्याबाबत तसेच विविध नेत्यांविषयी वापरलेली एकेरी भाषा नाशिककरांना मान्य नाही “कुंभमेळा थोतांड आहे” किंवा “अकबराने कुंभमेळा सुरू केला” अशा त्यांच्या विधानांचा त्यांनी निषेध केला. प्रयागराज येथे १५ हजार हेक्टर तर नाशिकमध्ये केवळ ३५० एकर जागा असून, मोठ्या संख्येने भाविक व साधूसंत येणार असल्याने काटेकोर नियोजन गरजेचे आहे.
भाजपने नेहमी पर्यावरणपूरक कुंभमेळा आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासाचे धोरण ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले. “फक्त झाडांना मिठ्या मारून वा त्यांना देवांची नावे लावून विकास अडवता येणार नाही. सकारात्मक सूचना आणि सहकार्याची गरज आहे,” असे केदार यांनी स्पष्ट केले.“कुंभमेळ्याच्या निमित्ताने मिळणारा निधी योग्यरित्या वापरून शहराचा विकास करणे महत्त्वाचे आहे. तपोवनाचा व नाशिकच्या पर्यावरणाचा जितका विचार आंदोलनकर्ते करतात, तितकीच काळजी सरकारलाही आहे. या विषयाचे राजकारण करू नये,” असे आवाहन केदार यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV