
रायगड, 4 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या प्रतिष्ठेच्या यादीत यंदा अलिबागची भक्कम मोहर उमटली आहे. रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे पार पडलेल्या शासकीय पुरस्कार समारंभात अलिबागच्या दोन होतकरू कलाकारांचा सन्मान झाला.
कस्तुरी देशपांडे–मांजरेकर हिला कलादान युवा पुरस्कार, तर अनुराग गोडबोले याला युवा संगीत संयोजक पुरस्कार देऊन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एक लक्ष रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून, दोघांनीही हा सन्मान अलिबागच्या कलाक्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरवला.
कस्तुरी देशपांडे आणि अनुराग गोडबोले यांनी शालेय शिक्षण आरसीएफ शाळेत पूर्ण केले. शास्त्रीय गायिका शीतल कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. पुढे कस्तुरीने निषाद बाक्रे, गौरी पाठारे आणि पं. अरुण कशाळकर यांच्याकडे तालीम घेतली. तिला भारत सरकारकडून राष्ट्रीय शिष्यवृत्ती, पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती, जयपूर गायकी विशेष पुरस्कार, गानवर्धन प्रतिष्ठानचा पं. जानोरीकर पुरस्कार असे अनेक मान मिळाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही तिने चमकदार यश मिळवत मुंबई विद्यापीठातील एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुवर्णपदक मिळवण्याचा मानही तिच्या वाट्याला आला. सध्या ती भारतीय शास्त्रीय संगीतावर पीएचडी संशोधन करत आहे.
अनुराग गोडबोले हा मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीधर असून, शास्त्रीय संगीताची तालीम पं. संजीव चिंबळगी यांच्याकडे घेतली. स्व. अनिल मोहिले यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्याने संगीत दिग्दर्शनाचे धडे गिरविले. मराठी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत त्याने संगीत संयोजनाची ठसा उमटवला आहे. बॉईज फोर, पांडू यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांचे पार्श्वसंगीत तसेच अवघूत गुप्ते, वैशाली सामंत यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसाठी संयोजनाची कामे त्याने केली आहेत.
अलिबागच्या या दोन प्रतिभावंतांनी राज्य पातळीवर गाजवलेल्या यशामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, कलाक्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके