नांदेड - वसरणी परिसरातील तरुणाचा विद्युतप्रवाहाचा धक्का बसून मृत्यू
नांदेड, 4 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड शहराजवळ असलेल्या वसरणी परिसरात आज दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत रोहित मीठुलाल मंडले (वय 23 वर्षे) या तरुणाचा 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला. रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब वाहिनीच्
नांदेड - वसरणी परिसरातील तरुणाचा विद्युतप्रवाहाचा धक्का बसून मृत्यू


नांदेड, 4 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड शहराजवळ असलेल्या वसरणी परिसरात आज दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत रोहित मीठुलाल मंडले (वय 23 वर्षे) या तरुणाचा 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला. रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडल्याची प्रारंभिक माहिती मिळाली आहे.

रोहित हा मूळचा जुने नांदेड, होळी परिसरातील बुरुड गल्ली, नावघाट येथील रहिवाशी होता. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो वसरणी परिसरातील शेतात काम करण्यासाठी गेला होता. दरम्यान, दुर्दैवाने घडलेल्या या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

मागील वर्षीच रोहितचे विवाह झाले होते. त्याची पत्नी सध्या गरोदर असल्याची माहिती त्यांचे सासरे चंदन यादव यांनी दिली. अधिक वेदनादायी बाब म्हणजे यापूर्वीच एका अपघातात रोहितचा मोठा भाऊ निधन पावला होता. आता घरात कमवणारा एकही सदस्य उरलेला नाही. वृद्ध आई-वडील आणि गरोदर पत्नी अशी परिस्थिती असताना कुटुंब पूर्णपणे उपजीविकेच्या आधाराविना उभे आहे.

या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, समाजबांधव आणि नातेवाईकांनी शासनाने तत्काळ आर्थिक मदत, सरकारी नोकरी किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी एकमुखाने मागणी केली आहे. कुटुंबाच्या आयुष्याची घडी पुन्हा बसविण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande