
छत्रपती संभाजी नगर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
राज्यातील पशुपालकांचे दुग्ध उत्पादन वाढवून त्यांचे उत्पन्न उंचावण्यासाठी विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचा टप्पा दोन कार्यान्वित करण्यात आला असून यात विदर्भ व मराठवाड्यातील सर्व 19 जिल्ह्यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रकल्प संचालक म्हणून डॉ. संजय गोराणी तर अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून डॉ. नाना सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यानुसार दुग्धविकास प्रकल्पांतर्गत 50 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादनक्षम गाई–म्हशींचे वाटप, तसेच बाह्य फलन तंत्राद्वारे (आयव्हीएफ) गाभण कालवडींचे 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय 50 टक्के अनुदानावर विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्र, 25 टक्के अनुदानावर पशुखाद्य, फॅट व एस.एन.एफ. वर्धक, मुरघास आणि 100 टक्के अनुदानावर उच्च प्रतीचे वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नियमित दूध उत्पादक पशुपालकांसाठी आधुनिक दुग्ध उत्पादन तंत्रज्ञानावर प्रशिक्षणाचे आयोजन तसेच जिल्हाभरातील पशुवैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थी निवडीसाठी पशुपालकाकडे किमान दोन दुधाळ जनावरे असणे व त्यांची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंद असणे आवश्यक आहे. तसेच किमान तीन महिने जिल्हा दूध संघ अथवा खाजगी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री केली असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, सातबारा, राशन कार्ड, दुग्ध उत्पादन प्रमाणपत्र, बीएलएसवरील जनावरांचे टॅग क्रमांक, बँक खाते पुस्तक इत्यादी कागदपत्रांची ऑनलाईन नोंद आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://vmddp.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधता येईल.
हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व लाभ तळागाळातील पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या जिल्हा उपायुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis