
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर, (हिं.स) छत्रपती संभाजीनगर येथील आयटीआयमधून उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी आज विविध आस्थापनांमध्ये नोकरी करत आहेत. गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमअंतर्गत आयटीआयच्या १९,००० विद्यार्थ्यांना, तर आयटीआयव्यतिरिक्त ५३,१९० विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अंतर्गत त्यांना महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीम आणि नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमअंतर्गत १७कोटींचे विद्यावेतनही मिळाले आहे. आयटीआयमध्ये असलेल्या विविध २ कोर्सेसच्या ८४ तुकड्यांमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत शहरी भागांमध्ये लहान-मोठ्या उद्योगांची संख्या वाढली आहे. यामध्ये कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची कायम ओरड होत असते. मात्र, औद्योगिक कारखान्यांना लागणारे तांत्रिक मनुष्यबळ हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) पुरवले जात आहे. कारखान्यांमधील आधुनिक तंत्रज्ञान व आयटीआयमधील प्रशिक्षण यामध्ये मोठी तफावत होती. मात्र, ही तफावत भरून काढण्यासाठी शिकाऊ उमेदवार कायद्याची निर्मिती करण्यात आली. या अंतर्गत आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कारखान्यामध्ये आणि त्यांच्या व्यवसायानुसार शिकाऊ उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis