
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग–रोहा मार्गावरील सुडकोली पुलासह रामराज नदीवरील महान फाट्याचा पूल हे दोन्ही पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचले असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलांवर खोल पोकळी, तडे, लोखंडी सळया बाहेर येणे, तर रस्त्यावर खड्डे इतके की रस्ता आणि खड्डा यात फरकच न उरणे—अशा भीषण परिस्थितीमुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी एसटी सेवा पूर्णतः ठप्प झाली असून नागरिक, विद्यार्थी, महिला व कामगार प्रचंड अडचणीत सापडले आहेत.
या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आज निवेदन देण्यात आले.
सुडकोली आणि महान फाट्यावरील पुलांची तात्काळ दुरुस्ती, वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग सुरू करणे आणि बंद झालेली एसटी सेवा त्वरित पूर्ववत करण्याच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावर कार्यकारी अभियंता श्रीमती एम. एम. धायतडक यांनी ८ दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून या मार्गाने प्रवास करत होते. पुलांची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की प्रवास करणे म्हणजे थेट जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. प्रशासनाने वाहतूक बंद करून जबाबदारी संपल्याचा आव आणला असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांची कोंडी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, कामगारांची रोजीरोटी आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
निवेदनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे—
“८ दिवसांत दुरुस्ती करा, पर्यायी रस्ता द्या, एसटी सुरू करा… अन्यथा तीव्र आंदोलन अपरिहार्य!” या आंदोलनात संतोष निगडे, पृथ्वीराज पाटील, ॲड. कौस्तुभ पुनकर, ॲड. अविनाश भगत, ॲड. महेश शिंदे, रमेश पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व प्रवासी सहभागी झाले. नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून प्रशासनाने तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके