अखंड वाचन यज्ञाचे बिगुल वाजले : अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न
डोंबिवली, 5 डिसेंबर (हिं.स.)। अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या सलग ३६ तास व एकत्रित ३०० अखंड वाचन यज्ञ उपक्रमाचे उद्घाटन माजी एसीपी व लेखक मंदार धर्माधिकारी, पुस्तक आदान प्रदान चळवळीचे संकल्पनाकार पुंडलिक पै, क
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान


डोंबिवली, 5 डिसेंबर (हिं.स.)।

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या सलग ३६ तास व एकत्रित ३०० अखंड वाचन यज्ञ उपक्रमाचे उद्घाटन माजी एसीपी व लेखक मंदार धर्माधिकारी, पुस्तक आदान प्रदान चळवळीचे संकल्पनाकार पुंडलिक पै, कल्याण पश्चिमचे माजी आमदार प्रकाश पाटील आणि ज्येष्ठ विधीतज्ञ विवेक बिवलकर यांचे हस्ते पार पडले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात मंदार धर्माधिकारी यांनी वाचनामुळे आपण कसे घडलो हे सांगितले. प्रकाश भोईर यांनी अनेक वाचन प्रसंगातून वाचनाचे महत्व उलगडून दाखविले तर पुंडलिक पै यांनी मुलांनी कोणती पुस्तके वाचावी या विषयी मार्गदर्शन केले. ॲड विवेक बिवलकर यांनी वाचनाचे बदलते स्वरूप याविषयी माहिती दिली. अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे संकल्पनाकार योगेश जोशी या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली आणि हा उपक्रम कसा साकारत गेला हे आपल्या प्रास्ताविकातून मांडले. ५ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता सुरू झालेला हा उपक्रम ६ डिसेंबर सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटन समारंभानंतर बालक मंदिर संस्था येथील वि. आ. बुवा वाचन नगरी, भारताचार्य चिंतामणराव वैद्य सभागृह, डॉ जयंत नारळीकर वाचन कट्टा, योगानंद क्लासेस येथील बाळ कोल्हटकर वाचन कट्टा येथे तसेच एकूण २५ शाळांमधून विविध विषयांवरचे वाचन सुरू झाले. गतवर्षी या उपक्रमात १६७८ वाचक सहभागी झाले होते तर यावर्षी २५०० हून अधिक वाचक सहभागी होणार असल्याचे सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले.

या उपक्रमात चित्रकार प्रदीप जोशी यांनी रेखाटलेल्या साहित्यिकांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरत आहेत. याप्रसंगी प्रकल्प प्रमुख डॉ सुश्रुत वैद्य, सुकन्या जोशी, प्रा प्रकाश माळी, नागराजन अय्यर,अमोल धर्माधिकारी, कैलास सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत नाना पालकर वाचनसत्र, स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनसत्र, नारायण धारप वाचनसत्र, मंगेश पाडगावकर वाचनसत्र, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनसत्र, भारतरत्न डॉ ए. पी जे अब्दुल कलाम वाचनसत्र, कुसुमाग्रज वाचनसत्र ना. धो महानोर वाचनसत्र अशा विविध सत्रांमध्ये विद्यार्थी , युवक आणि विविध रसिक वाचक कथा, कविता, कादंबरी, लेख यांचे वाचन करणार आहेत. तसेच विविध सत्रांमध्ये प्रशांत वैद्य , दत्तप्रसाद जोग, डॉ दिनेश प्रताप सिंग, माधव डोळे, नागेश हुलवळे , वैभव धनवडे, विजयकुमार देसले, मच्छिंद्र कांबळे, प्रवीण देशमुख, श्यामसुंदर पांडे, नंदा कोकाटे, सुकन्या जोशी आदी अनेक मान्यवर साहित्यिक आपल्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. विविध विषयांवरील कवी संमेलन, गझल मुशायरा, काव्यवाचन स्पर्धा, वाचू आनंदे उपक्रम, माझे आयडॉल उपक्रम, तसेच जयंत भावे यांच्या प्रतिबिंब व योगेश जोशी यांच्या वंद्य वंदे मातरम् या पुस्तकांचे प्रकाशन असे विविध उपक्रम अखंड वाचनयज्ञ अंतर्गत येथे सादर होणार आहेत अशी माहिती या संपूर्ण उपक्रमाचे संकल्पनाकार योगेश जोशी यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande