
अकोला, 5 डिसेंबर (हिं.स.)।
मृद व जलसंधारणाविषयी जनजागृतीबरोबरच जल प्रकल्पांच्या देखभाल-दुरूस्ती आदी कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात पाणलोट महोत्सव राबविण्यात येत आहे. गावांमध्ये जलसमृद्धीच्या दृष्टीने पाणलोट व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असून, महोत्सवातील विविध उपक्रमांत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत वॉटरशेड महोत्सव राबविण्यात येत असून, दि. 16 डिसेंबरपर्यंत अनेक उपक्रम घेतले जाणार आहेत. तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा येथे दि. 8 डिसेंबरला, बार्शिटाकळी तालुक्यातील सावरखेड येथे दि. 9 डिसेंबरला, मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथे दि. 10 डिसेंबरला, अकोला तालुक्यातील येळवण येथे दि. 11 डिसेंबरला, पातूर तालुक्यातील वरणगाव येथे दि. 12 डिसेंबरला, बाळापूर तालुक्यातील तामशी येथे दि. 13 डिसेंबरला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे नवीन कामांसाठी भूमीपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण, नागरिक संवाद आदी कार्यक्रम होतील, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी दिली.
सोशल मिडीया स्पर्धा!
पाणलोटाबाबत जनजागृती, लोकसहभाग वाढविण्यासाठी, पाणलोट विकास कामांना प्रोत्साहनासाठी सामाजिक माध्यम स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. स्पर्धकांना पाणलोट विकास घटक- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, तसेच इतर केंद्र किंवा राज्य शासनाच्या पाणलोट विकास योजनेत झालेली जलसंधारणाची कामे, फलोत्पादन, कृषी वनीकरण उपक्रम या विषयावरील रील्स आणि छायाचित्रे पाठविता येतील. रील्स
घटकात पाच सर्वोत्कृष्ट रील्सला प्रत्येकी 50 हजार रू. आणि 100 निवडक छायाचित्रांना प्रत्येकी 1 हजार रू. अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत 30 ते 60 सेकंदाचा लघु व्हिडीओ, रील्स सादर करता येईल. सहभागींनी आपले व्हिडीओ किंवा छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केल्यावर दि. 31 डिसेंबरपूर्वी मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर (wcd.pmksy.dolr.gov.in/registerMahotsav) नोंदणी करणे आवश्यक आहे. पोस्ट करताना WCD-PMKSY वॉटरशेड महोत्सव2025 असा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. पोस्टची लिंक ऑनलाईन नोंदणी अर्जात नमूद करावी. नोंदणी यशस्वी झाली की ई-मेलद्वारे पुष्टी केली जाईल. अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेण्याबाबत आवाहन श्री. मस्कर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे