
अकोला, 5 डिसेंबर (हिं.स.)।
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अकोला जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर अकोल्यातील शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर्स ही लावण्यात आले.मात्र या बॅनर्समुळे आता नव्या राजकीय चर्चांना ऊत आला आहे.याआधी संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांचा फोटो शहरात लावण्यात आलेल्या अनेक बॅनर्सवरून गायब असल्याचे समोर आले आहे.या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क–वितर्कांना सुरुवात झाली आहे.
अनावधानाने झालेली ही चूक आहे की पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचे हे प्रतिबिंब तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.कॅप्टन अडसूळ यांच्या नियुक्तीने जिथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तिथेच बॅनरवरील गायब फोटोमुळे निर्माण झालेला नवीन वाद शिंदे गटाच्या स्थानिक राजकारणाला वेगळे वळण देऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे