बीड जिल्ह्यातील पाटोदा बस स्थानकासाठी चार कोटी निधीची मान्यता
बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)। पाटोदा शहरातील बस स्थानकाच्या उभारणीत महत्त्वाची भर घालत महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून तब्बल चार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ही मंजुरी मिळवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक महिन्यांपा
बीड जिल्ह्यातील पाटोदा बस स्थानकासाठी चार कोटी निधीची मान्यता


बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)। पाटोदा शहरातील बस स्थानकाच्या उभारणीत महत्त्वाची भर घालत महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून तब्बल चार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ही मंजुरी मिळवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांनी वारंवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाटोदा बस स्थानकाच्या आवश्यक कामांसाठी निधी मंजुरीचा प्रस्ताव पुढे रेटला होता. अखेर त्यांचा पाठपुरावा फलदायी ठरला असून पाटोद्यासाठी हा मोठा विकासात्मक निर्णय ठरला आहे. प्रशासकीय मंजुरीतील प्रमुख कामांमध्ये पाटोदा बस स्थानक समोरील तसेच बस स्थानक गॅरेज समोरील उर्वरित काँक्रिटीकरण, बस स्थानक परिसराला संरक्षण भिंत उभारणी, या दोन अत्यावश्यक पायाभूत सुविधा सामावल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून बस स्थानक परिसरात अर्धवट काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे, रस्त्यांवर खड्डे तयार होणे व बस वाहतुकीला अडचणी निर्माण होणे असे प्रश्न सतत उपस्थित होते. प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच बस स्थानकाच्या कडेला संरक्षण भिंतीअभावी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. या सर्व तक्रारींचा आढावा घेत आमदार धस यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सर्व समस्यांची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी व तोंडी स्वरूपात सातत्याने दिली. परिवहन मंत्री सरनाईक यांनीदेखील पाटोदा शहरातील वाढत्या प्रवासी संख्येचा, ग्रामीण भागातील ये-जा करणाऱ्या शेतकरी, विद्यार्थी व कामगारांचा विचार करून तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले. यामुळे पाटोद्याचे बस स्थानक आता आधुनिक आणि सुव्यवस्थित रूपात उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात या निधीतून होणाऱ्या काँक्रिटीकरणामुळे बस स्थानक परिसर पूर्णपणे मजबुत होईल, वाहतूक सुरळीत व सुरक्षित बनेल, तर संरक्षण भिंत उभारणीमुळे संपूर्ण क्षेत्राला संरक्षित चौकट प्राप्त होईल. प्रवासी सुविधा वाढणे, स्वच्छता सुधारणे, बस थांबे आणि परिसर अधिक सुटसुटीत होणे अशा अनेक सोयी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. पाटोद्याच्या नागरिकांसाठी ही मोठी विकासात्मक कामगिरी ठरली असून हा निर्णय आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या तातडीच्या निर्णयक्षमतेचे फलित असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande