
अंतिम मतदार यादी १० डिसेंबरला
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल ७ हजार ५६७ आक्षेप दाखल झाले आहेत.
शेवटच्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. एकाच स्वरूपाच्या आक्षेपांची संख्या जास्त असल्याने स्थळपाहणी एकत्रित पद्धतीने केली जात आहे.
प्रभागनिहाय होणारी ही महापालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने यादीत मोठा गोंधळ असल्याचे मत मतदारांनी नोंदवले. अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे, नावे गायब किंवा दुबार नोंदी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. आजपर्यंत प्रशासनाने एकूण ४ हजार ६८ आक्षेपांचा निपटारा केला आहे. उर्वरित सुमारे साडेतीन हजार आक्षेपांचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाकडे केवळ प कालावधी शिल्लक आहे.
आलेल्या सर्व आक्षेपांची यादी तयार करून प्रभागनिहाय पथके घर ते घर पडताळणी करत आहेत. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने उर्वरित आक्षेपांचा वेळेत निपटारा करण्यासाठी प्रशासनाची जोरदार धावपळ सुरू आहे.
यादीतील गोंधळ पाहता मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्थळपाहणी मोहीम सुरू केली आहे. ते मतदारांना प्रत्यक्ष भेटून नावांची शहानिशा शहानिशा करत आहेत. अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे आणि निवडणूक विभागप्रमुख विकास नवाळे यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचारी प्रभागांमधील टीमसोबत प्रत्यक्ष तपासणी करत आहेत. आक्षेप स्वीकारण्यासोबतच त्यांचा त्याच दिवशी निपटारा करण्याच्या निर्णयामुळे तपासणीचा वेग वाढवण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis