
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. तापमानात घट झाली आहे. ही थंडी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, लसूण यांसारख्या पिकांना थंड हवामान पोषक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांनी याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
या भागात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीसह कांदा, लसूण मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. या पिकांच्या वाढीसाठी थंड आणि समशीतोष्ण हवामान आवश्यक असते. थंडीमुळे गहू आणि हरभऱ्याच्या दाण्यांची भरघोस वाढ होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
कांदा, लसूण, कोबी, फुलकोबी यांसारख्या भाजीपाला पिकांसाठीही थंडी उपयुक्त आहे. त्यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. थंडीमुळे काही प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भावही नैसर्गिकरित्या कमी होतो.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. पहाटे पडणाऱ्या धुक्याचा पिकांवर परिणाम होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis