
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उसर येथे केंद्र सरकारच्या अंगीकृत गेल (इंडिया) कंपनीचा ११,२५६ कोटी रुपयांचा पीडीएच-पीपी प्रकल्प अत्यंत वेगाने उभारला जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) दुर्लक्षामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या गतीला गेल्या महिनाभरापासून अक्षरशः ‘ब्रेक’ लागला आहे.
३ नोव्हेंबर २०२५ रोजी अलिबाग–उसर मार्गावरील वढाव–वेलवलीदरम्यान असलेला छोटा पूल अचानक कोसळला. त्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुलाचा पर्यायी मार्ग तयार न झाल्याने गेल कंपनीच्या प्रकल्पासाठी देश-विदेशातून येणारी अवजड यंत्रसामग्री उसरपर्यंत पोहोचू शकलेली नाही. कोट्यवधींची परदेशी मशिनरी घेऊन आलेली ही वाहने तळोजा, जेएनपीटी, पनवेल आणि पेण परिसरात रस्त्याच्या कडेला महिनाभर उभी असून त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
गेल इंडिया प्रशासन आणि ठेकेदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अद्याप कोणतीही कामाची सुरुवात झालेली नाही. प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेली उपकरणे रस्त्याच्या अलिकडे मोकळ्या जागेत ठेवावी लागत असल्यामुळे प्रकल्प उभारणीला मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. यातून कंपनीसह ठेकदार यंत्रणेला आर्थिक नुकसान तर होतच आहे, परंतु या प्रकल्पावर आधारित रोजगारालाही धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, अलिबाग–उसर मार्गावरील कोसळलेल्या पुलाच्या नव्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली. शासनाकडून मंजुरी मिळताच काम सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके