५३ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाला उत्साहाची लगबग; ग्रामीण मुलांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढली
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। पंचायत समिती शिक्षण विभाग आणि आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडले. य
५३ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाला उत्साहाची लगबग; ग्रामीण मुलांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढली


रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। पंचायत समिती शिक्षण विभाग आणि आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार नाम. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना नाम. तटकरे म्हणाल्या की, “भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर झेप घेत आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे देश वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र म्हणून पुढे जात आहे. अशा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त वैज्ञानिक गुणांना वाव मिळतो. या संधीचा योग्य उपयोग केल्यास या विद्यार्थ्यांमधून उद्याचे संशोधक आणि वैमानिक निर्माण होतील, ज्यामुळे देशाची प्रगती अधिक वेगाने होईल.” भविष्यात तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी आणि सर्व शाळांना सोयीस्कर ठरेल अशा दोन शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा (लॅब) उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक वर्गात स्क्रीन-आधारित डिजिटल शिक्षण सुरू करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती तथा आयडियल इंग्लिश स्कूलचे सचिव नाजीम हास्वारे होते. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी माधव जाधव, निवासी नायब तहसीलदार डॉ. मृणाली शिरसाट, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, अनिल बसवत, प्राचार्य बारी सर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नितीन पाटील, अव्वल कारकून सलीम शहा, अंजुमन हायस्कूलचे प्राचार्य अ. रहमान घराडे, गणित-विज्ञान मंडळ, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्स, नव्या संकल्पना आणि वैज्ञानिक प्रयोगांना उपस्थित मान्यवरांनी मोठी दाद दिली. कार्यक्रमाची सांगता प्रशंसनीय प्रतिसादात संपन्न झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande