
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)।
ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा ग्रंथालय संघ, अलिबाग यांच्या विद्यमाने तसेच सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबाग यांच्या सहकार्याने शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग अलिबागमध्ये सुरू होत आहे. जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे दि. १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. वर्गांचे आयोजन शनिवार व रविवार या दिवशी करण्यात येणार असल्याने विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह इच्छुक नागरिकांसाठी ही सोयीची संधी ठरणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२वी उत्तीर्ण अशी निश्चित करण्यात आली आहे. ग्रंथालय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तसेच वाचनालय सेवेशी निगडित व्यावसायिक पात्रता मिळवू पाहणाऱ्यांसाठी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी २० डिसेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक वाचनालय, अलिबाग (डोंगरे हॉल) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे. अभ्यासक्रमाबाबतची सविस्तर माहिती किंवा प्रवेशासंबंधी मार्गदर्शनासाठी वर्ग व्यवस्थापक श्री. भालचंद्र वर्तक (मो. ९९२१५५१९५२) तसेच सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबागच्या ग्रंथपाल सौ. रजिता माळवी (मो. ८८०५७१६५१२) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
या उपक्रमाबाबत रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे आणि सार्वजनिक वाचनालय अलिबागचे अध्यक्ष अँड. गौतम पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून अलिबाग परिसरातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके