
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)।
पैठण येथील जायकवाडी धरणावर तब्बल बारा हजार हेक्टर क्षेत्रावर दहा हजार कोटी रुपये निधीतून जगातील सर्वात मोठ्या फ्लोटिंग सोलार प्रकल्प होणार आहे.
जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गतीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. प्रकल्पाच्या साहित्याला लागणारी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने बॅक वॉटर परिसरातील तीन ठिकाणची ६५ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आली आहे. यात शेवगाव तालुक्यातील कढेटाकळी, दहीफळ, एरंडगाव, लाखे फाटा, सोनवाडी येथील जमिनीचा समावेश आहे. हा सौरऊर्जा प्रकल्प धरणाच्या पाण्यावर तरंगता असणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासन तयारी सुरू केली असून, नवीन वर्षात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
याप्रकल्पामुळे सुमारे २८% बाष्पीभवन कमी होऊन जलाशयातील पाण्याचे संवर्धन होईल. ज्याचा पक्षी व वन्यजीवांना मोठा फायदा होईल. हा प्रकल्प पक्ष्यांच्या प्रजनन, खाद्य व जलविहार क्षेत्रापासून दूर असेल. प्रकल्प दोन क्लस्टरमध्ये राबवण्यात येणार आहे. प्रत्येक क्लस्टरसाठी एक-एक पुलिंग सबस्टेशन प्रस्तावित असून त्यापैकी एक पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात आणि दुसरे त्या क्षेत्राबाहेर असणार आहे.
हा प्रकल्प एनटीपीसीच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. या प्रकल्पातून १३४२ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणार आहे. संबंधित वीज प्रामुख्याने औद्योगिक विकास व शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. जायकवाडी धरण व पक्षी अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ३३ हजार ९८९ हेक्टर आहे. यापैकी केवळ ४२५२ हेक्टर (सुमारे १२% जलाशय क्षेत्र)प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. हा प्रकल्प जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात असला तरी सौर पॅनल्स पक्ष्यांच्या निवासस्थानाजवळ बसवले जाणार नाहीत.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis