तपोवनातील वृक्षांचे करणार पुनर्रोपण - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
नाशिक, 5 डिसेंबर (हिं.स.)। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शहरातील पेलिकन पार्क
तपोवनातील वृक्षांचे करणार पुनर्रोपण कुभमेळा मंत्री गिरीश महाजन


नाशिक, 5 डिसेंबर (हिं.स.)।

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

शहरातील पेलिकन पार्क येथे आज दुपारी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उप अभियंता हेमंत नांदुर्डीकर, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले, की राज्य शासन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. यास नाशिक शहराचा अपवाद नाही. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच तपोवन परिसरातील दहा वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच नाशिक शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल. आगामी कुंभमेळा हरित आणि डिजिटल करण्याचे नियोजन आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तपोवन परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यासाठी केवळ 10 वर्षांच्या आतील 1 हजार 700 वृक्षांचे पुन:रोपण शहरातील सिडको येथील पेलिकन पार्क, गंगापूर गाव येथील कानेटकर उद्यानासह उपलब्ध जागांच्या ठिकाणी केले जाणार आहे. यासह शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लागवड शासन व लोकसहभागातून केली जाणार आहे. यात वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश असून 15 फूट वाढ झालेले हे वृक्ष हैदराबाद येथून मागविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) खर्च करण्यात येणार आहे. तपोवनातील वृक्षांच्या पुन:रोपणासह नवीन लावण्यात येणाऱ्या वृक्षांची योग्य देखाभाल व निगा राखण्यात येईल. या वृक्षांमुळे हरित नाशिक- हरित कुंभमेळा संकल्पना साकार होवून आगामी काळात पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande