
परभणी, 5 डिसेंबर (हिं.स.)।
नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर येथे आज कै. ह. बा. दळवी सरांच्या स्मृतिदिनानिमित्त विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. नूतन विद्या समितीचे संस्थापक सदस्य आणि माजी मुख्याध्यापक असलेल्या ह. बा. दळवी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची आठवण ठेवत स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष अनिल अश्टूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे, नूतन विद्या समितीचे सहसचिव व मुख्याध्यापक अनंत पांडे, संचालक वेंकटेशजी तोरंबेकर तसेच परीक्षक आनंद हरिभाऊ देशमुख, सौ. कल्पना रत्नेश्वर दलाल, सौ. विद्या नितीन मालेवार उपस्थित होते.
स्वा. सावरकर सायळा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कापरे मॅडम, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. ढगे, उपमुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक शिवाजी आरळकर, सूर्यकांत पाटील, सहाय्यक पर्यवेक्षक सुनील रामपूरकर, नंदकिशोर साळवे तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे अभिजीत कोरान्ने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री. अनंत पांडे यांनी दळवी सरांच्या शैक्षणिक व सामाजिक आदर्शांची उजळणी केली. दळवी सरांचे परभणी शहरातील शैक्षणिक योगदान, त्यांचे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्य यांचे स्मरण त्यांनी भावनिक शब्दांत केले. “परभणीत शिक्षणाची पंढरी उभारण्याचे कार्य दळवी सरांनी केले,” असे पांडे सरांनी म्हटले.
उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना ध्येय निश्चितीचे महत्त्व अधोरेखित केले. “सचिन तेंडुलकर एका खेळामुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाला; कलाकार आपल्या कलेमुळे ओळखले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही स्वतःचे ध्येय निश्चित करून प्रयत्न केले तर यश निश्चित आहे,” असे ते म्हणाले.
मराठवाडा हायस्कूलला “गुणवंत विद्यार्थ्यांची खान” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्ष अनिल अश्टूरकर यांनी आपल्या भाषणात शाळेतील विद्यार्थ्यांनी देश-विदेशात तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. “आजही आम्ही दळवी सरांचे नाव अभिमानाने घेतो. त्यांचा वैचारिक वारसा आमच्या कार्याला दिशा देतो,” असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वकृत्व विभागाचे संयोजक गोपाळ रोडे, शिवप्रसाद कोरे, सौ. सोनूने, सौ. शेळके, विद्यार्थी संसद सदस्य श्रीपाद कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी, डॉ. सुनील तुरुकमाने, गणेश काळबांडे, प्रशांत डाफणे, वसंत पुरी, आर. बी. उफाडे, शिवराम कटारे, अमोल गोरकटे, राजेंद्र भारती, नितीन बिरादार, अरुण ठेंगडे, गणेश सूर्यवंशी, अविनाश जाधव, कंधारकर, विश्वास दिवाळकर, विनोद लोलगे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis