
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने तसेच पाणी फाउंडेशनच्या मदतीने आयोजित सत्यमेव जयते ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला अलिबाग तालुक्यात उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील वरसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात ४ डिसेंबर रोजी हा उपयुक्त प्रशिक्षण संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी तन्मय अरविंद भगत यांनी केले. पाणी फाउंडेशनतर्फे आशीष लाड आणि कु. निकिता मोकल यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती, पाणी बचत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक शेती नियोजनाचे महत्त्व या प्रशिक्षणाद्वारे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले.
सत्रादरम्यान शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे फायदे, सेंद्रिय शेती पद्धती, पीकनिहाय सुधारित तंत्र, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे उपाय, पाणी व्यवस्थापन आणि हवामानानुसार पीक बदलाचे मार्गदर्शन देण्यात आले. तज्ज्ञांनी प्रत्यक्ष उदाहरणे देत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. सहभागी शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडत सत्र अधिक संवादात्मक बनवले.
कार्यक्रमात ‘फार्मर कप २०२५-२६’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमाद्वारे प्रगतशील शेती पद्धतींचा प्रसार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात हजेरी लावली. सर्व उप कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती कार्यक्रमाला बळ देणारी ठरली. कार्यक्रमाचे आभार पोयनाड मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी मानले.
कृषी विभागाने अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज काळाची मागणी असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त करत अशा उपयुक्त प्रशिक्षणांचे प्रमाण वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके