
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)।पुण्यात पीएमपीएमएलच्या बसमध्ये प्रवास करताना अनेकदा चालक तोंडात गुटखा, पान किंवा तंबाखू भरून ड्रायव्हिंग करताना आणि रस्त्यावर थुंकताना दिसतात. त्यामुळे रस्तेही लाल थुंकाच्या डागांनी खराब झालेले असतात. प्रवाशांना याचा मोठा त्रास होतो आणि संस्थेची प्रतिमा मलीन होते.हा प्रकार आता थांबणार आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी चालकांसाठी कठोर नियम लागू केले आहेत.
ड्युटीदरम्यान जर कोणताही चालक तंबाखूजन्य पदार्थ खाताना किंवा रस्त्यावर/सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळला, तर त्याच्यावर त्वरित कारवाई होईल.
अशा चालकाला एक हजार रुपये दंड ठोठावला जाईल आणि तो दंड वसूल केलाच जाईल. थुंकण्यास सक्त मनाई आहे. हे करणे म्हणजे प्रवाशांच्या नजरेत पीएमपीएमएलची बदनामी करणे आहे, असे स्पष्ट मत देवरे यांनी मांडले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु