
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)।
पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचून सहभाग नोंदवावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थाचालक व प्राचार्य यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा विशेष उपक्रम ९ डिसेंबरला होत असून सकाळी ११ ते दुपारी १२ या एका तासात संपूर्ण पूणे शहर शांततेत वाचन करणार आहे. पुणेकरांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले. या उपक्रमातून वाचनसंस्कृतीला अधिक चालना मिळेल, असेही ते म्हणाले.महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी पुणे हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट न म्हणता पश्चिमेकडील नालंदा म्हणावे असे गौरवोद्गार काढले. कुलगुरूंनी मान्यवरांचे स्वागत केले.उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी वाचन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्र-कुलगुरु डाॅ. पराग काळकर, डाॅ. ज्योती भाकरे, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, देविदास वायदंडे, डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु