
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. तब्बल 22 हजार 809 तक्रारी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे व क्षेत्रीय कार्यालयांना प्राप्त झाल्या, तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सर्वांत कमी 87 हरकतींची नोंद झाली आहे.
प्रत्येक तक्रारींचे योग्य निवारण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्याने या तक्रारींचा निपटारा करताना महापालिकेच्या निवडणूक विभाग कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. दरम्यान, या तक्रारींवर सुनावणी होणार नाही. तक्रारींची तपासणी होऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक 41 प्रभागांमध्ये होणार आहे. या प्रभागांची प्रारूप मतदार यादी महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले असून, तक्रारींची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे यादीत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या असून, 3 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्यास मुदतवाढ दिली होती. प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे दुबार झाली होती, तर काही मतदारांची नावे केवळ आजूबाजूच्या प्रभागात नाही, तर दुसऱ्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील याद्यांमध्ये आल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु