
बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)।
कारखानदारांविरोधात साखर विविध आंदोलने केल्यानंतर माजलगाव येथे झालेल्या बैठकीत अखेर २७७५ ते २८०० रुपये पहिली उचल व अंतिम दर रिव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलाअंतर्गत देण्याचे कारखानदारांनी कबूल केल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली.
माहितीनुसार, किसान सभेचे नेते कॉ. अजित नवले, राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह साखर कारखान्याचे संचालक, युवा शेतकरी संघर्ष समितीचे
पदाधिकारी यांच्या बैठकीत हा तोडगा निघाला.
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला होता. शेतीतील ऊस तोडणी थांबवून आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. तसेच ऊस तोड कामगार व वाहतूक संघटनांनी देखील आंदोलनास पाठिंबा देत ऊस तोडणी आणि ऊस वाहतूक बंद ठेवली होती. जिल्ह्यातील शेकडो ग्राम पंचायतींनी व सेवा सहकारी सोसायटी यांनी ठराव घेत आंदोलनात पाठिंबा दिला होता.
ऊस दरवाढीच्या संदर्भात बीड जिल्ह्यातील आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी रिव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला अंमलबजावणी, रिकव्हरीतील पारदर्शकता, ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लूट थांबवणे, २६५ उसाच्या वाणांच्या नोंदी, उत्पादन वाढविण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी आमचा लढा सुरू राहणार आहे. केवळ कारखानदारांशी संघर्षात्मक भूमिका न राहता कुणी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या योजनांवर काम करणार असेल तर उसाचा बीड पॅटर्न पुढे आणण्यासाठी आम्ही सहकार्य करू.
असे अॅड. अजय बुरांडे, किसान सभा, बीड यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis