थंडीमुळे वीज वापरात घट, जळगावातील दीपनगर औष्णिक केंद्रातील तीन संच बंद
जळगाव, 5 डिसेंबर (हिं.स.) राज्यभर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अवकाळी पावसाच्या सरी आणि प्रखर थंडीच्या लाटेमुळे वीज वापरात मोठी घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० आणि ५०० मेगावॅट क्षमतेचे तीन महत्त्वाचे संच ता
थंडीमुळे वीज वापरात घट, जळगावातील दीपनगर औष्णिक केंद्रातील तीन संच बंद


जळगाव, 5 डिसेंबर (हिं.स.) राज्यभर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अवकाळी पावसाच्या सरी आणि प्रखर थंडीच्या लाटेमुळे वीज वापरात मोठी घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० आणि ५०० मेगावॅट क्षमतेचे तीन महत्त्वाचे संच तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या केवळ ६६० मेगावॅटचा संच क्रमांक ६ कार्यरत असून त्यातून राज्याला अंदाजे ५०० मेगावॅट वीज पुरवली जात आहे. राज्यातील सरासरी वीज मागणी २९,७०० मेगावॅटवरून जवळपास २५,००० मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. वापर घटल्याने दीपनगर केंद्रातील २१० मेगावॅटचा संच क्र. ३ आणि ५०० मेगावॅटचे संच क्र. ५ तात्पुरता थांबवले आहेत. तसेच संच क्रमांक ४ हे ५०० मेगावॅटचे युनिट वार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असल्याने एकूण १२१० मेगावॅट उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. वीज मागणीत घसरण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे तापमानातील अचानक घट. परिणामी एअर कंडिशनरचा वापर, पंपिंग यंत्रणा तसेच कृषी आणि औद्योगिक वीज वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मागणी पुन्हा वाढल्यानंतर बंद ठेवलेले संच टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील, अशी माहिती ऊर्जा विभागाकडून मिळते. दरम्यान, केंद्रात एकच युनिट सुरू असल्याने फ्लाय अॅशचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande